I inspired by YOGA and Meditation

त्यानंतर योगासनाच्या प्रचार आणि प्रसाराला गती मिळाली. आज विद्यार्थी दशेपासून ते वयोवृद्धांपर्यंत योगासनांच्या माध्यमातून आरोग्य ठणठणीत ठेवण्याला प्राधान्य दिले जात आहे. मात्र योगासनाला अजूनही प्रचार-प्रसाराची तितकीच आवश्यकता असल्याचे सातत्याने जाणवते. मग नेमके योगासन म्हणजे काय? तर शरीर, शरीरातील सांधे लवचीक बनविण्यासाठी, शरीर निरोगी राखण्यासाठी, शरीराचा आकार बांधेसूद राखण्यासाठी आणि मन शांत व एकाग्र करण्यासाठी केलेली शरीराची विशिष्ट प्रकारची आकृती म्हणजे योगासन, अशी शास्त्रीयदृष्ट्या योगासनाची व्याख्या केली जाते. त्याला जोडून एक भाग असतो तो म्हणजे मेडीटेशन अर्थातच ध्यानधारणा. ध्यानधारणा म्हणजे ताणतणाव सहन करण्यासाठी मन बळकट करणे, तसेच तो नियंत्रित ठेवून स्ट्रेस फ्री आणि सक्षम आयुष्याकडे वाटचाल करणे होय. आज मी शारीरीक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम असण्यासाठी योगासन कारणीभूत आहेत. त्याचबरोबर शरीर तंदरूस्त, बळकट आणि पिळदार राहण्यासाठीही योगासने महत्त्वाची असतात.

४ नोव्हेंबर २०१७ साली मी डेक्कन क्लिफ स्पर्धा पूर्ण केली. खरे पाहता ही स्पर्धा तुमची शरिरापेक्षा मानसिक सक्षमता पाहणारी स्पर्धा असते. कारण,जेव्हा तुमचे शरीर तुम्हाला सांगत असते की, आता तुमचे हातापायासह संपूर्ण शरीर साथ देऊ शकत नाही. त्याचवेळी तुमचे मन सुदृढ आणि प्रोग्रॅम केलेले असेल तर ते शरीराला संदेश देते की ही स्पर्धा मला कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करायचीच आहे. आणि मग शरीराला मनाचे ऐकावेच लागते.

या स्पर्धेसाठी तुम्हाला ६४३ किलोमीटरचे अंतर पार करावे लागते. या स्पर्धेपूर्वी मी सर्वाधिक १४७ किलोमीटर इतके अंतर पार केले होते. त्यादृष्टीने डेक्कन क्लिफ ही स्पर्धा कठीणच होती. मात्र, ही स्पर्धा पूर्ण करण्याचा निश्चय मी केलेला होता. त्यासाठी मी दररोज पहाटे उठून योगासन, ध्यानधारणा, धावणे आणि सायकलिंगचा सराव करायचो. त्याचबरोबर ‘व्हिज्युअलायझेशन’ ही करायचो. त्यामुळे ही स्पर्धा सुरू झाल्यापासून ते पूर्ण होईपर्यंत काय-काय करावे लागेल, हे अनुभवायचो. त्याचा परिणाम म्हणजे तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी आपोआपच प्रवृत्त होतात. दैनंदिन सराव जसे की नियमित व्यायाम, धावणे ,पोहणे, सायकलिंग सोबत योगासन, ध्यानधारणा आणि इच्छाशक्तीच्या जोरावर ही स्पर्धा पूर्ण मी करू शकलो. त्यानंतर माझा आत्मविश्वास द्विगुणित झाला. वयाच्या पन्नासाव्या वर्षी मी आयर्नमॅन स्पर्धेत सहभागी होण्याचा निश्चय केला.

योगासन म्हणजे संपूर्ण जगाला भारताकडून मिळालेले वरदानच मानावे लागेल. योगासन आणि ध्यानधारणा हे एकमेकांना पूरक असतात. आज मी आयर्नमॅन आणि डेक्कन क्लिफसारख्या स्पर्धा पूर्ण करण्यासाठी प्रोत्साहन मिळाल ते योगासन आणि मेडिटेशनमुळेच. पोलीसा खात्यात काम करताना आम्हाला चोवीस तास अलर्ट राहावे लागते. त्यासाठी जितके फिट तुमचे शरीर हवे, तितकेच फिट तुमचे मनही हवे. भारताच्या अथक परिश्रमामुळे योगासनाचे महत्त्व जगभरात पोहोचले. शरीर आणि मन फिट ठेवण्यासह रोग निवारणाच्या या पद्धतीला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेली आहे. संयुक्त राष्ट्राने २१ जून २०१५ पासून जागतिक योगदिवस साजरा करण्यास मान्यता दिली आहे.

अतिशय खडतर व अवघड असलेली ही स्पर्धा अवघ्या १६ तासांमध्ये पूर्ण करावी लागते. मात्र वर उल्लेख केलेल्या दैनंदिन सरावामुळे आयर्नमॅन ही स्पर्धा वेळेच्या आत म्हणजेच अवघ्या १५ तास १३ मिनिटांत पूर्ण केली. यामध्ये प्रथम चार किलोमीटर स्विमिंग, १८० किलोमीटर सायकलिंग आणि ४२ किलोमीटर रनिंग (धावणे) या तीन स्पर्धांचा समावेश असतो. वयाच्या ५२ व्या वर्षी २६ ऑगस्ट २०१८ मध्ये निर्धारीत वेळेपेक्षा कमी वेळेत सराव आणि योगासनांच्या जोरावर ही स्पर्धा पूर्ण करता आली.

त्यामुळेच मला असे वाटते की, योगासनाच्या आणि व्यायामाच्या बळावर जगातील सर्वाधिक काठिण्य असलेली स्पर्धा पूर्ण करता येत असेल तर दैनंदिन अडचणींवर मात करणे सहज शक्य आहे. उदाहरणार्थ पोलीस खात्यात काम करणाऱ्या प्रत्येकाला चोवीस तास अलर्ट राहून काम करावे लागते. विद्यार्थ्यांना दररोज अभ्यासाचा आणि स्पर्धेचा ताण, तर नोकरवर्ग, उद्योजक, व्यापारी आणि गृहिणींनाही त्यांच्या कामांचा ताण असतोच. या सर्वांनी योगासनांना जवळ केल्यास ताणतणाव तुमच्यापासून नक्कीच दूर जाईल, यात शंका नाही. योगासने करीत असाल तर भविष्यात सातत्य ठेवा, सातत्य असेल तर सातत्य टिकविण्यासाठी प्रयत्न करा, योगासने येत नसतील तर तज्ज्ञांकडून शिका… पण, योगासने जरूर करा आणि आपापल्या क्षेत्रातील कार्यक्षमता वाढवा.

 

User Avatar
Dr. Ravinder Singal

1 comment

  • धन्यवाद सर अतिशय महत्वपुर्ण माहीती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *