एकीचे बळ

मला कोणीतरी लहानपणी सांगीतलेली ही एक जुनी कहाणी आहे.
एकदा जंगलात वणवा पेटतो, चारी बाजूंनी पेटलेला वणवा वाढतच जात असतो.
वणव्याच्या रिंगणाबाहेर असलेले पक्षी भितीने स्तब्ध होऊन धुमसलेल्या आगीकडे हतबुध्द होऊन बघत असतानाच त्यांना एक चिमणी वणव्याकडे जाताना दिसते.
चिमणी तिच्या चिमुकल्या चोचीतून आणलेले पाण्याचे चार थेंब आगीवर शिंपडते.
एकदा नाही अनेकदा हेच होताना बघून चकीत झालेले पक्षी तिला म्हणतात
“बाई गं, हा वणवा आहे ,तुझ्या चार थेबांनी तो विझणार नाही ,का हे व्यर्थ प्रयत्न करते आहेस, ज्वाळेच्या एका झोताने तुझे पंख जळतील आणि एकदा पंख गेले की काय उरेल गं तुझ्याकडे ”
त्यावर चिमणी म्हणते “आग पसरवत जाणं हा वणव्याचा स्वभाव आहे पण माझ्याकडूनतो जितका विखवता येईल ते प्रयत्न करणं हा माझा स्वभाव आहे.”
“आता मी एकटी असेनही पण तुम्हीही माझ्यासारखाच प्रयत्न केलात तर कदाचित हा वणवा आटोक्यात येईल.
“लक्षात घ्या आता तुम्ही वणव्याच्या रिंगणाबाहेर असालही पण या ज्वाला तुमच्यापर्यंत कधी पोहचतील हे काय सांगावं”
इतकं बोलून चिमणी पुन्हा एकदा चोचीत पाणी घेऊन आगीच्या दिशेनी जाते.
मित्रांनो, सध्या आपलं जगही अशाच कोव्हीडच्या वणव्यात सापडलं आहे.हा वणवा आपल्या घरापर्यंत पोहचण्याची वाट बघू नका.चिमणीसारखा छोटासा प्रयत्न आपणही करू शकतो.
रोखू शकतो या भडकलेल्या वणव्याला !
जेव्हा एक माणूस दोन पावले टाकतो तेव्हा तो एकटा असतो, त्याच्याबरोबर दुसराही दोन पावले टाकायला लागला तर ती सोबत होते पण सगळेच दोन पावलं टाकायला लागले तर ती चळवळ होते.

करोनाच्या लढ्यात फक्त दोन पावलं टाका !

  • मास्क वापरा. विनाकारण घराबाहेर पडू नका, बाहेर पडण्याची वेळ आलीच तर सामाजिक अंतर राखा. गर्दी करू नका, गर्दी टाळा.हे दिवसरात्र आपल्या कानावर पडते आहे हे खरे असले तरी मी ही बंधने पाळतो का ? हा प्रश्न स्वतःलाच एकदा विचारा !
  • प्रशासन आणि सरकार यांच्या चांगुलपणावर विश्वास ठेवा. जेव्हा तुम्ही घरात स्वस्थ बसले असता तेव्हा लाखो सेवा आघाडीचे कर्मचारी स्वतःचे आयुष्य पणाला लावून दिवसरात्र काम करत असतात. त्यांच्या प्रयत्नाला दाद म्हणून आरोग्य विषयक सर्व नियम आपण पाळतो आहोत का याची एकदा खातरजमा करा.
  • अफवांच्या वावटळीत वाहवत जाऊ नका. सामाजिक माध्यमांचा वापर जबाबदारीने करा. अफवा रोखा. अफवांना बळी पडू नका.
    आपल्या सुरक्षेसाठी घातलेल्या निर्बंधांची चेष्टा करू नका. निर्बंधाबद्दल सकारात्मक विचार करा.
  •  माणुसकीचा धर्म विसरू नका. तुम्ही स्वस्थ तर जग स्वस्थ ! तुमचे स्वास्थ्य म्हणजेच जगाचे स्वास्थ्य असा विचार करा.
  •  या काळात अनेकजण सुरक्षित असूनही मानसिक दडपणाखाली आहेत आणि मानसिक रोगांना बळी पडत आहेत. नैराश्यावर मात करण्यासाठी योग्य व्यक्तींचा सल्ला घ्या.
  • तुमचे स्वास्थ्य हा तुमचा एकट्याचा प्रश्न नाही, तुमच्या संपूर्ण कुटुंबाचा प्रश्न आहे. अशी अनेक कुटुंब म्हणजेच आपल संपूर्ण समाज. सामाजिक आत्मभान सदैव जपा.
    माझ्या आवडत्या गीताचे एक कडवे सोबत देतो आहे ते जरूर वाचा.

लाभले आयुष्य जितके ते जगावे चांगले
पाउले चालो पुढे.. जे थांबले ते संपले
घेतला जो श्वास आता तो पुन्हा ना लाभणे
माणसाने माणसाशी माणसासम वागणे

Ravinder Singal
Ravinder Singal
https://ravindersingal.com
Quitters Don’t Win and Winners Don’t Quit. Ironman | Deccan Cliffhanger | Comrade Legend Finisher | Motivational Speaker | Writer | Endurance Athlete

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *