एक टक्क्याची गोळाबेरीज

माझे एक मित्र आहेत. ते पुस्तकप्रेमी असल्याने पुस्तकं शोधत रद्दीची दुकानं पालथी घालत असतात. त्यांची काही निरीक्षणे लक्षणीय आहेत.
“रद्दीत आलेल्या डायऱ्या चाळून बघितल्या तर वर्षाच्या सुरुवातीच्या आठवड्यात नियमित नोंदी केल्या जातात. नंतरच्या आठवड्यात एखाद दिवसाच्या फरकाने आणि नंतर त्या तुरळक होऊन उरलेल्या महिन्यांची पाने कोरी असतात आणि डायरी लिहिण्याची हौस संपलेली असते”
आमच्या याच मित्राचे आणखी एक मूलभूत संशोधन असे की, प्रत्येक रद्दीच्या गठ्ठ्यात डेल कार्नेजीच्या ‘ How to win friends and… ‘ या पुस्तकाच्या किमान दोन प्रती अगदी ‘मिंट ’ कंडिशन   मध्ये सहज मिळतात ???
असं का होतं याचं उत्तर ‘हौस’ या शब्दातच आहे.
मग प्रश्न असा उभा राहतो की डायरी काय किंवा कार्नेजी काय, यांच्या प्रेमात पडलेली माणसं त्यांचा काहीच दिवसात द्वेष का करायला लागतात ?
कारण शोधणं अगदी सोपं आहे ते आधीच सांगून टाकतो .
डायरी नियमित लिहिणं आणि कार्नेजी सांगतो त्याप्रमाणे आयुष्य बदलणं म्हणजे डोक्यावर सतत सक्तीची तलवार टांगल्यासारखं वाटतं.म्हणूनच मिळालेल्या पहिल्या संधीत दोन्हीची विल्हेवाट लावली जाते.
हौस नेहमीच अल्पजीवी असते.पण या हौस शब्दाचे ‘सवय’ या शब्दात रूपांतर करा आणि बघा चार दिवसाची अल्पजीवी हौस सवयीच्या रुपात चिरंजीव झालेली असते.
पण हे घडवून आणण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे लागतात.
रोजच्या दैनंदिनीमध्ये फक्त १% फरक घडवून आणणं फारच कठीण असतं पण एकदाच हा प्रयोग करून बघा. प्रयोग करून बघा सांगणं हे सोपं असतं. एखादं उदाहरण बघितल्याशिवाय प्रेरणा मिळणं देखील मुश्किल असते. म्हणून आज एक कथा वाचू या !
ब्रिटीश सायकलींग संघाची ही गोष्ट आहे. सर डेव्ह ब्रेल्सफोर्ड यांच्याकडे या संघाचे नेतृत्व २००२ साली आले तेव्हा या संघाची स्थिती फारच वाईट होती.
हा संघ म्हणजे एकेकाळी पराभूतांचा संघ होता.
गेल्या ७६ वर्षात त्यांना एकच सुवर्ण पदक मिळाले होते.
गेल्या ११० वर्षात सायकलींगची पंढरी असलेल्या ‘टुर द फ्रान्स’ एकही विजेता ब्रिटीश नव्हता.
पण सर डेव्ह ब्रेल्सफोर्ड यांनी या संघाचे नेतृत्व करायचे ठरवले आणि सगळे काही बदलले !
कसे ? ते आता जाणून घेऊ या.
ब्रेल्सफोर्ड यांनी सायकलींगशी संबंधित संपूर्ण प्रक्रिया छोट्या छोट्या तुकड्यात विभागली आणि त्यात फक्त १% बदल केला आणि ते तुकडे पुन्हा जोडून नवी प्रक्रिया अंमलात आणली.
आता १% काय बदल केले ते पण वाचलेच पाहिजे नाही का ?
त्यांनी सायकलच्या सीट आरामदायी केल्या.
चांगली ग्रीप मिळावी म्हणून रबरी टायरवर अल्कोहोल चोपडायला सुरुवात केली.
सायकलपटूंच्या ओव्हरशॉर्ट इलेक्ट्रिकली गरम ठेवण्याची व्यवस्था केली ज्यामुळे स्नायूंना हवी तशी गरमी मिळाली.
दुखावलेल्या स्नायूंवर वेगवेगळी औषधे वापरून जे त्वरीत आराम देईल त्याची निवड केली.
सायकलपटूंच्या अंथरुण- उशा-पांघरूण यात बदल केला.
सर्जनचा सल्ला घेऊन शर्यती दरम्यान हात गोठू नयेत म्हणून हात धुण्याची पध्दत बदलली.
प्रत्यक्षात हे बदल इतके सूक्ष्म होते की एकूण बदलांची गोळाबेरीज १% हून अधिक नव्हती.
आणि पुढच्या ५ वर्षात चमत्कार घडला.
२००८ बिजींगच्या ऑलींपिक्समध्ये ६०% सुवर्ण पदकं ब्रिटीश संघाला मिळाली.
२०१२ च्या लंडन ऑलींपिक्समध्ये सायकलींगचे ९ उच्चांक आणि ६ जागतिक उच्चांक ब्रिटीश संघाने स्थापित केले.
त्याच वर्षी इतिहासात पहिल्यांदा टू द फ्रान्स जिंकण्याचा मान ब्रिटीश सायकलपटू ब्रॅडली विगिन्सला मिळाला.
यानंतर एकावर एक ऐतिहासिक विजय या संघाला मिळत गेले आणि हा फरक फक्त १% ने घडवून आणला होता.
हेच १% गणित ज्यांना समजत नाही ते डायरी आणि डेल कार्नेजीचा राग करायला सुरुवात करतात.
आता इथे डायरी आणि कार्नेजीचा काय संबंध असा तुमचा प्रश्न असेलच !
सत्य हे आहे की डायरी आणि कार्नेजीचे पुस्तक डोळ्यासमोर दिसले की आयुष्य एकाच दमात १००% बदलायला हवे असा मनाचा गैरसमज होतो.मानवी मन आहे ते , आणि त्यामुळे ती १००% ची टांगती तलवार डोळ्यासमोर नकोशी होते आणि बिचारी डायरी आणि बिचारा कार्नेजी रद्दीच्या दुकानात जाऊन पडतात.
कार्नेजी काय किंवा डायरी काय यांचा आग्रह १००% बदल घडवून आणा असा नसतो.आग्रह इतकाच असतो कि फक्त बदल घडवून आणा!
 तेव्हा हा १% बदल करण्याचा फॉर्म्युला वापरून बघा. बदल घडवून आणायला कोणताही दिवस चांगलाच पण आज नेमका चैत्री पाडवा आलाय तर सुरुवात करायला काय हरकत आहे ?
Ravinder Singal
Ravinder Singal
https://ravindersingal.com
Quitters Don’t Win and Winners Don’t Quit. Ironman | Deccan Cliffhanger | Comrade Legend Finisher | Motivational Speaker | Writer | Endurance Athlete

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *