आपल्या नजरेच्या खिडकीतून....

माझी मुलं आता वयानं मोठी म्हणावी अशी आहेत पण कालच माझी मुलगी मला विचारत होती ” डॅड, हा लॉकडाऊन कधी संपेल “.खरं म्हणजे हा लॉकडाऊन का आणि काय आहे याची कल्पना तिला आहे. पण तिच्या आवाजातली काळजी मला मनातले आर्त सांगत होती. ते आर्त म्हणजे ते मनाचे दु:ख आपल्या सगळ्यांनाच सध्या छळते आहे.आपल्या आयुष्याचा एक कालावधी कोणीतरी अपहरण करून नेला आहे असं आपलं मन सांगतं आहे. हे दु:ख केवळ माझ्या मुलीचं आहे असं नाही, तुमच्या माझ्या सगळ्यांच्याच मुलांचं हे दु:ख आहे. ते सहन करण्याची मनाची ताकद ज्याला आपण इमोशनल कोशंट म्हणतो त्याचा परिघ वाढवत राहणे ही आताच्या काळाची गरज आहे.यासाठी एक प्रमाणभूत कार्यक्रम तयार करून तो राबवण्याची आवश्यकता आहे. ज्यामुळे हा लॉकडाऊन संपेल तेव्हा ही मुलं पुन्हा एकदा भरारी घेतील.

घराच्या चार भिंतीच्या चौकटीत हा गोठवलेला काळ व्यतित करणं हे मोठे आव्हान आहे. हे आव्हान मोठ्यांना समजलं आहे पण ज्यांनी अजून काळाचे परिमाण पुरेसे बघितलेच नाही त्या लहान मुलांचं काय ? जी शाळेत जायच्या वयात आहेत त्यांना ते भान आहे पण बंदीस्त होण्याचे कारण समजण्याचे त्यांचे वय नाही. ज्यांनी बाहेरचे जगच अजून पाहिले नाही त्यांचा या जगाबद्दल काय मानसिक समज होणार आहे हे पालकांनाही कळलेले नाही. हा काळ असा आहे की ज्यांना पंख फुटले आहेत त्यांचे पंख छाटले गेले आहेत आणि ज्यांना अजून पंख फुटले नाहीत त्यांच्या नजरेत छाटलेले पंख म्हणजेच जग अशी समजूत होणार आहे.

यावर उपाय काय ? आपण इतक्या सार्‍या वर्षात जमवलेली सर्जनशीलताच आपल्या मदतीला येऊ शकते. स्वत:ची कीव करत बसण्यापेक्षा या मुलांना घरात बसून बाहेरचे जग कसे आहे ते आपण दाखवू या ! आपले अनुभव त्यांना सांगू या, आपले कामाच्या गराड्यात दबलेले कौशल्य त्यांना दाखवू या. त्यांच्यासोबत पुन्हा एकदा त्यांच्या वयाचे होऊ या. मुलांच्या हातात मोबाईल देऊन त्यावर त्यांना दिवसभर मिकी माऊस किंवा त्यासारखी कार्टून्स बघायला भाग पाडलंत तर बाहेरचे जग हे एखाद्या कार्टून स्ट्रीपसारखंच आहे असा त्यांचा समज होईल.

तेव्हा आता आपण कामाला लागू या. सतत सकारात्मक राहण्याची कला मुलांना शिकवू या. त्यांच्या सोबत राहून त्यांच्या मनातले भावनिक तरंग ओळखून जर ते नकारात्म्क असतील तर त्यांना कसा निरोप द्यायचा ते शिकवू या. सकारात्मक तरंग मनात कसे निर्माण करायचे ते त्यांना शिकवू या. पण ही केवळ कोरडी विधानं झाली. प्रत्यक्षात काय करायचं ते ठरवू या. अशा काही अ‍ॅक्टिव्हीटी त्यांच्या सोबत करू या ज्यामुळे मनात सकारात्मक उर्जा तयार होईल. त्याचे एक सुंदर उदाहरण देतो.

लॉकडाऊनच्या पहिल्या सत्रात पुण्यातल्या एका ८२ वर्षाच्या सुरेश बापट या वृध्दाला हा मुद्दा नेमका कळला.त्यांची नातवंडं वेळ घालवण्यासाठी जी चित्रं काढत होती त्यात फक्त परीकथेतील पात्र त्यांना दिसत होती. टॉम -जेरी- मिकी माऊस -सिंड्रेला- वगैरे वगैरे. हे गृहस्थ सर्जनशील चित्रकार असल्यामुळे त्यांना मुलांच्या भावविश्वात घडणारा गोंधळ लक्षात आला. वयाच्या ८२ व्या वर्षी त्यांनी पुन्हा एकदा हातात ब्रश घेतला आणि लहान मुलांना त्यांच्या चित्रातून बाहेरचे जग दाखवायला सुरुवात केली.थोड्याच दिवसात त्यांनी १००हून अधिक चित्रं काढून लहान मुलांना बाहेरचे सुंदर जग दाखवले. असंच काहीतरी करण्याची वेळ आता आली आहे.

रशियाच्या कडाक्याच्या थंडीत जेव्हा घराबाहेर पडणं मुश्कील असतं तेव्हा लढाई म्हणजे काय हे समजून घेता घेता बुध्दीबळाच्या पटावर लढाई खेळता खेळता मिखाईल ताल नावाचा जगज्जेता निर्माण झाला. हा संदर्भ कदाचित परदेशी वाटत असेल तर आपल्या मुंबईतले उदाहरण घेऊ या. माधवबागेच्या परिसरात राहणार्‍या एका पांगळ्या मुलाला खिडकीजवळ एक खुर्ची मांडून दिवसभर ठेवलेले असायचे. या खिडकीतून बाहेर बघता बघता त्याच्या प्रतिभेला पंख फुटले आणि ‘स्वराज्याचा श्रीगणेशा’ ‘वीरधवल’ सारख्या अजरामर कादंबर्‍या जन्माला आल्या.

सांगायचा मुद्दा हा आहे की आपण सर्वांनी इतकी सारी वर्षं जे बाहेरचे जग बघीतले आहे ते या मुलांच्या समोर वेगवेगळे प्रयोग सादर करून उलगडून दाखवण्याची ही वेळ आहे. प्रयोग काय कराल ते तुमच्या अनुभवांवर आहे. पण तुम्हीच ते करू शकता कारण तुमची मुले भविष्यकाळ आहेत, त्या भविष्यकाळाला जर तुम्ही बाहेरच्या जगातल्या प्रकाशाची अनूभूती दिली नाहीत तर हा भविष्यकाळ अंधाराने झाकोळून जाईल. पांडोराच्या पेटीतून हा कोव्हीडचा सैतान बाहेर पडला आहे पण त्याच पेटीतून शेवटी आशा नावाची परी पण बाहेर पडणार आहे हे तुम्ही-आम्हीच या मुलांना समजावून सांगायला हवे आहे.

अशा निराश वातावरणात काही गीते मला प्रेरणा देतात त्यापैकी साहिरचे हे गीत !

वो सुबह कभी तो आएगी

इन काली सदियों के सर से,

जब रात का आँचल ढलकेगा

जब दुःख के बादल पिघलेंगे,

जब सुख का सागर छलकेगा

जब अंबर झूम के नाचेगा,

जब धरती नग्में गाएगी

वो सुबह कभी तो आएगी

Ravinder Singal
Ravinder Singal
https://ravindersingal.com
Quitters Don’t Win and Winners Don’t Quit. Ironman | Deccan Cliffhanger | Comrade Legend Finisher | Motivational Speaker | Writer | Endurance Athlete

4 comments

  • सरजी ये आपका सबसे बेहेतरीनवाला पोस्ट है जो कि इस लॉकडाउन🔒 के परिस्थिती मै हमारे घरवालो के लिए. बाहुत ही महत्वपूर्ण ओर प्रेरणादायी रहै गा. इस परिस्थिती मै अपने आपको संभाल ने का एक जजबा दे गा.

    आपके इस पोस्ट के लिए बहुत धन्यवाद !, 🙏🙏.

  • मैं आपसे रूबरू हुआ हु आप बहोत अच्छे इंसान है मुझे आपकी हर एक्टिविटी अच्छी लगती है आप सांसारिक होने के साथ साथ ऋषी है

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *