आंतरराष्ट्रीय बालिका दिन

 माझ्या बालमैत्रिणींनो,

आंतरराष्ट्रीय बालिका दिन आहे. तुम्ही बालिका म्हणून जन्मास आल्यात याबद्दल प्रथमतः मी तुमचे मनःपूर्वक अभिनंदन करू इच्छितो. तुम्हाला ईश्वराने उपजतच एक संवेदनशील मनाची देणगी दिलेली आहे. एक भावनिक साद अन् जीवनाला एक हळूवार स्पर्श करण्याची एक अनोखी शक्ती तुमच्या ठायी वसत असते. तथापि, त्याचवेळी, मला या गोष्टीची सुध्दा जाणीव आहे की, तुंम्हाला एक बालिका, एक स्त्री म्हणून ब-याच काही गोष्टी या साध्य करावयाच्या आहेत. समाजात तुम्हाला पुरूषांइतकेच समान संधींचे स्थान प्राप्त करावयाचे आहेत.

अगदी प्राचीन काळापासून ते आजतागायत, मुलींच्या व स्त्रियांच्या जीवनाची गुणवत्ता सुधारण्याचे प्रयत्न हे सर्वजण वेळोवेळी होत आलेले आहेत. मुलींनी शिक्षण घेणे संपूर्ण कुटुंब व समाजासाठी किती गरजेचे आहे, याची चांगली जाणीव आज सर्वांना झालेली आहे. आरोग्याची जीवनशैली तर एकिकडे सुधारते आहे, परंतू त्या तुलनेत मुलींच्या जीवनात फार मोठा असा काही फरक पडतांना दिसत नाही. अनेक घरांमध्ये मुलींच्या आरोग्याकडे काहिसे दुर्लक्षच होताना दिसत असते. तरी सुध्दा, आपण शाळांमध्ये मुलींच्या शिक्षणाच्या प्रवाहातून वगळले जाण्याचे प्रमाण व कुमारिकांच्या बाबतीत कुपोषणासारख्या समस्या जवळपास सार्वत्रिक आढळतात. आता ही सर्व परिस्थिती बदलण्याची गरज आहे.

नाशिकसारख्या महानगरात, मुलींना ज्या काही समस्या या भेडसावत असतात, त्यांचे वैविध्य भरपूर आहे. एक मुलगी एक विद्यार्थिनी म्हणून तुम्ही जेव्हा शाळां-महाविद्यालयात जात असतात, तेव्हा तुमचे पालक फार मोठया आशेने तुमच्या व्यक्तिमत्वविकासाची पायाभरणी होत आहे, असे समजत असतात. त्यांना एक विश्वास असतो. त्यामुळेच तुम्ही सगळ्यात रचनात्मक रित्या या शिक्षण संधींला तुम्ही योग्य तो प्रतिसाद हा दिलाच पाहिजे.

एक पोलिस आयुक्त म्हणून माझ्या समोर अनेक प्रकरणे ही येत असतात, की जेथे मुलींचा संदर्भ असतो. सध्याच्या जगात तुमच्यापुढे अनेकविध प्रकारची आमिषे ही खुणावत असतात. त्यातही तंत्रज्ञान ही सर्वात मोठी अशी एक दुहेरी तलवार आहे. तुम्हाला तंत्रज्ञान हे फार जपून वापरावयाचे आहे, हे लक्षात ठेवा. तुमच्या हाती आज मोबाईल आणि इंटरनेट साऱखी साधने आहेत. तुम्ही अवतीभोवतीच्या सायबर जगताशी जोडले जात असतात. त्यामुळे तुम्ही नेमके कोणाशी केव्हा जोडले गेलेले असतात, कोण तुमच्या संपर्कात आहेत, कोणाशी आपला संपर्क या तंत्रज्ञानाच्या वापरातून होतो आहे, हे कळणे तसे मुश्किलच असते. त्यामुळे आपल्या नेटवरील मित्र खरोखरच कोण आहेत, त्यांचे चारित्र्य, त्यांची वृत्ती, पार्श्वभूमी अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. तेव्हा तुम्ही पुरेशी काळजी घेतली पाहिजे की, नक्की तुम्ही कोणाला आपले मित्र-मैत्रिणी वा नेट वरील सहकारी म्हणत आहात. कोणत्याही व्यक्तिशी वा मित्रमैत्रिणींशी तुम्ही आपली व्यक्तिगत, खासगी माहिती ही शक्यतो शेअर करता कामा नये. तंत्रज्ञानातील बारकावे माहित नसतांना अशी माहिती शेअर करणे हे तुमचे व्यक्तिगत जीवन उगाचच ढवळून काढू शकते.

षोडशवयातील मुलींना तशी अनेक गोष्टींचे आकर्षण हे काहीअंशी नैसर्गिकच असते. त्यात गैर काही नाही, पण त्याचा गैरफायदा हा कोणी घेता कामा नये, हेच येथे सांगावेसे वाटते. तुमच्या या वयात जे शारीरिक बदल होतात, हार्मोन्सचा प्रभाव वगैरे बाबी या खूप भावनावश करीत असतीलही, परंतू तुम्ही कदापि, आपले शिक्षक, पालक व समाजातील आदर्शांनी दिलेला वसा वा शिकवण ही विसरता कामा नये. तुम्हाला जी जीवनशैली शिकविण्यात आलेली आहे, ती तुम्ही विसरता कामा नये. तुम्हाला तुमच्या या वयातील प्राधान्याच्या गोष्टी नक्की कोणत्या आहेत, हे ठरवायला हवे. सर्वोत्तम ते ज्ञान संकलित केले पाहिजे. हे केवळ ज्ञान आणि ज्ञानच आहे, की जे तुम्हाला तुमच्या पायावर, ज्ञानाच्या भरभक्कम अशा ट्रॅकवर जीवनात सन्मानाने व स्वाभिमानाने उभे करणार आहे, हे कायम लक्षात ठेवा.

शेवटी बालमैत्रिणींनो, कोणतेही स्वातंत्र्य हे काही जबाबदारी सुध्दा आपल्या अंगी असणे हेच सांगत त्याचा अविष्कार हा घडवून आणत असते. स्वातंत्र्य आहे तर काही नैतिक जबाबदारी कर्तव्ये वा जबाबदारी सुध्दा आहेत. मी तर नेहमीच असे म्हणत असतो की, हे सर्व मुलामुलींना कळलेच पाहिजे. एक आयुक्त म्हणून माझ्याकडे जेव्हा अशा मुलींच्या पळून जाण्याच्या संदर्भात तक्रारी येतात, तेव्हा फार अंतर्मूंख होत चिंतन करावे लागते, हे असे का घडते. पालकही जेव्हा अशा काही चेह-याने तक्रारी करतात, की जणू तेच बिचारे काही गुन्हा अपराध करून आहेत, आपण पालनपोषणात कमी पडल्याची भावना कदाचित त्यांना सतावत असावी. कितीतरी मुली घरी परततात, तर ज्या आल्या नाहीत, त्यांच्याबाबत शोध घेईपर्यंत पालकही चिंताक्रांत असतात. काही पालक मनातून पार खच्ची झाल्याचेही मी पाहिलेले आहे. तेव्हा मी सुध्दा काहीसा अस्वस्थ होत असतो. पण क्षणभरच. कारण हे थांबविले पाहिजे, ही आमची जबाबदारी आहे, म्हणूनच मी आज बालमैत्रिणींनो मी तुमच्याशी हा संवाद मनसोक्तपणे साधत आहे. एक पोलिस आयुक्त म्हणून ही माझी जबाबदारीच समजतो की, तुम्हाला मी एक सुरक्षित, जेथे कोँणतेही धोके-टक्केटोणपे नाहीत, असे वातावरण देणे हे माझे कर्तव्य आहे. नव्हे तो तुमचा अधिकारच आहे, असे मी समजतो आणि पोलिस खाते हे त्यासाठी पूर्णत समर्पित व सजग आहे, असा विश्वास मी तुम्हाला देऊ इच्छितो. तुम्हाला हरएक प्रकारे मदत वा सहाय्य कऱण्यासाठी पोलिस खाते सदैव तुमच्या सेवेत आहे, हे कायम मनावर ठसवा. तुम्ही आणखी कणखर व स्वातंत्र्य मुक्तपणे पण तितक्याच जबाबदारीने जगायला शिकले पाहिजे, हे लक्षात ठेवा. त्यासाठी तुम्हाला तुमचे मन, वर्तन, स्वभाव व चारित्र्य यांची योग्य ती सांग़ड घालावी लागेल, असे मला मनोमन वाटते. ती केवळ तुमच्यातील शक्ती वा आदिशक्तीच आहे, जी तुम्हाला आयुष्यात पुढे पुढे नेणार आहे. मी तुम्हाला येथे अगदी आवर्जूनच जाणीव करून दिली पाहिजे की, एक युवा पिढीचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही देखील तेवढ्य़ाच जबाबदारीने वर्तन हे ठेवलेच पाहिजे.

मला देखील तुमच्याच वयाची एक कन्या आहे. मी सुध्दा तिला अशाच प्रकारचे काही सांगत व समजावत असतो वेळोवेळी. अभ्यास करीत असतांनाच तुम्ही आयुष्याचा आनंद भरभरून घ्यायला सुध्दा शिकले पाहिजे. आपल्या स्वप्नांना आकार देण्यास शिकले पाहिजे. मी तुम्हाला अधिकाधिक मोठी स्वप्ने पाहण्याचे आवाहन जरूर करीत राहिल. तुम्ही आयुष्यात स्वतः काहीतरी ग्रेट नक्की बना. तुमची स्वतःची एक खास ओळख बनवा. त्यासाठी कदाचित तुम्हाला खूप कष्ट सोसावे लागेल, तसे ते सगळ्यांनाच करावे लागत असते. त्यातूनच तुम्ही जीवनातील सर्वोच्च अशा श्रेष्ठ स्थानी पोहचू शकेल. एकदा की तुम्ही अशाप्रकारे काम केले की तुम्ही खूप यशस्वी जीवन जगलेच म्हणून समजावे. एक फार मोठा बदल सकारात्मक चैतन्य तुम्ही समाजातही आणू शकाल. जगात सुध्दा तुम्हाला एक मानाचे स्थान त्यातून मिळेल, व समाज व जगात एक फार मोठा आश्वासक, सकारात्मक बदल तुम्ही घडवून आणू शकाल. या सुंदर वसुंधरेवर मग तुंम्हाला पुरूष जातीइतकेच समान स्थान व संधी ही मिळू शकेल.

एक वडील व पिता म्हणून आपली कन्या, मुलगी ही यशाची, ज्ञानाची खूप उंचच उंच शिखरे पादाक्रांत करतांना बघणे हे खूपच आनंदाचे असते. तुम्हाला उंचच उंच भरारी घेण्यासाठी पंख आहेत, ज्ञानाचे. तेव्हा भरारी घ्या. उंच व लांब उडी देखील मारायला शिका. काहीतरी खेळत चला, एकातरी खेळात नाव व समाधान कमवा, खूप मेहनत घ्या, मोठे बनालच, तुमच्यातील ऊर्जा एकेक अविष्कार घडवू द्या..आत्मविश्वासपूर्वक वाटचाल करा..योग्य ती वाट ..दिशा निवडा..तुम्हाला कधीही काही वाटले तर जरूर पोलिस खात्याशी संपर्क साधा, मी तुम्हाला आश्वासन देतो,, ग्वाही देतो की आम्ही जरूर आपणास सर्वोतोपरी सहकार्य करूच करू…ईश्वरी आशीर्वाद असू द्या आपल्यावर …

हार्दिक शुभेच्छा….

— ड़ॉ. रविंद्र कुमार सिंगल, (आयपीएस.)

   पोलिस आयुक्त, नाशिक पोलिस आयुक्तालय.

Dr. Ravinder Singal
Dr. Ravinder Singal

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *