Spare Time For Self

Time “समय” ,  दिलो में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम…..

‘लग्‍नापूर्वी मी मस्तपैकी फिरायला जायचो, वाट्टेल तिथे ट्रेकिंग करायचो. लग्‍नानंतर मात्र नोकरी आणि कुटुंब एवढंच माझं वलय. यातून आता वेळच मिळत नाहीये.’
‘हो, खरं तर मला आवडतं चित्र काढायला; पण नवरा, मुले, सासू-सासरे यांच्‍या गराड्यात वेळच नसतो छंद जोपासण्यासाठी.’
‘कॉलेजात असताना एक काळ गाजवलाय. माझ्या गाण्याचे हजारो चाहते होते. काहीजण आजही ओळखतात मला…’

यांसारखे असंख्य संवाद आपल्‍या आजूबाजूला वावरणाऱ्यांच्‍या तोंडून सहजपणे ऐकायला मिळतात. आयुष्याच्‍या एका टप्‍प्‍यावर नोकरी, लग्‍न, मुले आणि संसाररूपी भवसागरात जीवनात ठरविलेली काही गणिते हळूहळू कशी बदलतात हे बराच काळ जाईपर्यंत कळतदेखील नाही. मात्र, यामध्ये आपण स्‍वतःलाही हरवून बसतो. काहींनी आयुष्यात कधीकाळी जोपासलेली सर्वोत्‍कृष्ट गायक, चित्रकार, धावपटू, सायकलपटू, कवी, लेखक आदी बिरुदे कालौघात विरून जातात. इतिहासाच्‍या कोणत्‍याच पानावर या व्‍यक्‍तींची कधीही दखल घेतली जात नाही. कारण, अशा व्यक्ती केवळ वेळेच्‍या नियोजनाअभावी पावसाच्‍या सरीप्रमाणे पडद्याआड जातात… अगदी नकळतपणे. हे होऊ द्यायचे नसेल तर वय, पद, प्रतिष्ठा, जबाबदाऱ्या या सर्वांचे भान ठेवून वेळेचे नियोजन केल्‍यास सर्वकाही स्वतःचे छंद जिवंत ठेवता येऊ शकतात. त्‍यासाठी आवश्यकता आहे ती इच्‍छाशक्‍तीची. आणि हो, हे सर्वकाही सहज शक्‍यही आहे.

२६ ऑगस्‍ट २०१८ रोजी मी फ्रान्‍सच्‍या आयर्नमॅन स्‍पर्धेत सहभाग घेऊन वयाच्‍या ५१व्‍या वर्षी अवघ्या १५ तास १३ मिनिटात स्‍पर्धा पूर्ण केली. ही स्‍पर्धा पूर्ण करण्याचे संपूर्ण श्रेय मेडिटेशन आणि व्‍हिज्‍युअलायझेशनला जाते. मी पहाटे तीनला उठून मेडिटेशन करायचो. ज्‍यामुळे माझे मन आणि मेंदू बळकट झाले. त्यानंतर व्‍हिज्‍युअलायझेशनद्वारे आयर्नमॅनची तयारी करीत असे. उगवत्‍या सूर्याच्‍या साक्षीने रनिंग, वॉकिंग आणि सायकलिंग अशी तयारी करायचो. आयर्नमॅन स्‍पर्धेची तयारी अगोदर मन आणि मेंदूच्या परिपक्वतेतून झाली होती. यातूनच आत्मविश्वास निर्माण होऊन यशोशिखर गाठता आले. अवघ्या १५ तास १३ मिनिटात ३.८ किलोमीटर पोहणे, १८०.२ किलोमीटर सायकलिंग आणि ४२.२ किलोमीटर धावून ही स्‍पर्धा पूर्ण केली. त्‍यामुळेच मला वाटते, की विजय मिळविण्यासाठी मनात दृढनिश्चय करणे अत्‍यंत महत्त्वाचे असते. त्‍यानंतर जिंकण्यासाठी तुम्‍हाला ५० टक्‍के प्रयत्‍न करावे लागतात. तुमचे मन बलशाली करण्यात यशस्वी झालात तर तुम्‍हाला तुमच्‍या ध्येयापासून कोणीही रोखू शकत नाही. एकंदरीत, डिप्रेशन आणि एन्‍झायटी यांसारखे मानसिक आजार तुमच्‍या जवळ फिरकणारदेखील नाहीत. तुम्‍ही तुमच्‍या करिअरमध्ये मोठी उंची गाठू शकता.

गेली २३ वर्षे मी पोलीस खात्‍यात कार्यरत आहे. यादरम्‍यान सहायक पोलीस अधीक्षकापासून ते पोलीस महानिरीक्षकापर्यंतची अनेक महत्त्वाची पदे सांगली, अमरावती, नाशिक, धुळे, मुंबई, नांदेड, नागपूर, ठाणे आणि औरंगाबादेत भूषविता आली. पोलीस खाते म्‍हणजे चोवीस तास धावपळ. मात्र, वेळेचे योग्‍य नियोजन केल्‍यास तुम्‍ही तुमचे छंद, आवडीनिवडी जोपासू शकता. यादरम्‍यान फोटोग्राफी, सायकलिंग, पोहणे, क्रिकेट, पिस्‍टल शूटिंग, मॅरेथॉन आणि सामाजिक कार्याची आवड तसूभरही कमी झाली नाही. वेळ मिळेल तेव्‍हा घरी अथवा कार्यालयाच्‍या ठिकाणी छंद चांगल्‍या पद्धतीने जपता आले. माझ्या मते, तुमचे छंद तुम्‍हाला जिवंत ठेवतात. सर्वसामान्‍य नागरिक, उद्योजक, व्‍यापारी, नोकरवर्ग आणि प्रामुख्याने तरुणांना मी सांगू इच्‍छितो, की सकाळी पाच ते सात हा वेळ तुमचे छंद जपण्याचा व सृजनशील काम करण्याचा सर्वोत्तम वेळ आहे.

पहाटेच्या वेळी निसर्गात सकारात्‍मक ऊर्जा निर्माण झालेली असते. शांत, स्तब्ध आणि शुद्ध अशा वातावरणात मेडिटेशन आणि व्‍हिज्‍युअलायझेशनच्‍या माध्यमातून ही ऊर्जा तुमच्‍यात येऊ शकते. त्‍याशिवाय वाचन, लिखाण, धावणे, चित्रकला, व्‍यायाम आदी छंद जोपासण्यासाठी तुम्‍हाला पुरेसा वेळही देता येतो. पहाटेची शांतता, सूर्योदयाचे आल्हाददायी दृश्यासोबत तुमचे छंद आणि त्‍यातून निर्माण होणाऱ्या सकारात्‍मक विचारातून सर्जनशील कल्‍पना जन्‍माला येतात, असे माझे स्‍पष्ट मत आहे. त्‍याशिवाय तुम्हाला दिवसभराचे नियोजन करता येते. चोवीस तासांचे नियोजन म्‍हणजे तुमचे आयुष्याचे नियोजन ठरते. अर्थात पहाटे उठण्याकरिता तुम्‍हाला रात्रीही लवकर झोपावे लागेल, हे वेगळे सांगावयास नको. सकाळी मनाला आणि मेंदूला मिळालेली शांतता ही दोहोंना शक्तिशाली बनविते.
थोडक्‍यात जिंदगी ना मिलेगी दोबाराच्‍या अखेरीस बुल रेसमध्ये फरहान अख्तर, ह्रतिक रोशन आणि अभय देओल सहिसलामत राहतात. तेव्‍हा फरहान अख्तरच्‍या आवाजातील ही शायरी नक्‍कीच आठवते.

दिलो में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम..
नज़र में ख्वाबों की बिजलियाँ लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम..
हवा के झोकों के जैसे आज़ाद रहना सीखो
तुम एक दरिया के जैसे लहरों में बहना सीखो..
हर एक लम्हें से तुम मिलो खोले अपनी बाहें
हर एक पल एक नया समां देखे ये निगाहें..
जो अपनी आखों में हैरानियाँ लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम..
दिलो में तुम अपनी बेताबियाँ लेके चल रहे हो तो जिंदा हो तुम..

Ravinder Singal
Ravinder Singal
http://ravindersingal.com
Quitters Don’t Win and Winners Don’t Quit. Ironman | Deccan Cliffhanger | Comrade Legend Finisher | Motivational Speaker | Writer | Endurance Athlete

44 comments

Comments are closed.