ता. १७ नोव्हेंबर २०२४. सकाळचे ९.०० वा वाजले होते. रविवार असल्याने मी माझे निवासस्थान होतो. सकाळचे मनाला शांत ठेवणारे वातावरण होतं ! पक्षांचा चिवचिवाट मंजूळ आवाजात सुरू होता ,परिसरात थंड गारवा पसरलेला होता. मी नेहमीच्या कामांचा रविवार असल्याने तात्पुरता विराम घेत असताना, महानगरपालिका आयुक्तचा संदेश आला – “विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने मतदातांमध्ये जनजागृतीसाठी आयोजित बाईक रॅलीसाठी आपण आता येऊ शकता.” अल्पशी पूर्व तयारी करून ठेवली होती व त्यात हा संदेश वाचताच, उत्साहाची एक लहर अंगभर पसरली. बाईक चालवण्याचा मला छंद आहे , तो असूनही अनेक वर्षे ऑफिसच्या कामकाजात दडून गेला होता. हा संधीचा क्षण सोडायचा नाही, असं मी मनाशी ठरवलं. माझ्या सिव्हिल लाईन्समधील निवासस्थानातून बुलेटला सेल्फ स्टार्ट केले. वार्म ऑफ करीत टेस्ट ड्राईव्ह घेतली. सर्व तयारी आणि खात्री झाल्यावर सोबत काही आवश्यक अधिकारी व अंमलदारांसह आम्ही सर्व महानगरपालिकाच्या दिशेने मार्गस्थ झालो.
महानगरपालिकाच्या मुख्यालयाच्या पटांगणात मी माझ्या सहकाऱ्यांसोबत बुलेट सह पोहोचलो, तेव्हा त्या ठिकाणी वातावरणात उत्साह ओसंडून वाहतांना दिसला. जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, जिल्हा परिषदेचे सीईओ, निवडणूक निरीक्षक, पोलीस अधिकारी आणि नागपूर शहरातील तरुणाई सगळे एकत्र जमले होते. नोव्हेंबर महिन्याची थंड सकाळ व निवडणुकीच्या तयारीत नागपूरकरांना मतदान जनजागृतीसाठी होणारी धडपड ! यामुळे वातावरण चारही बाजूने भारावलेलं होतं. जेव्हा रायडर्सच्या पोशाखात मी बुलेट चालवत मुख्यालयात पोहोचलो, तेव्हा उपस्थित अधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर आश्चर्य व कौतुक दिसलं. ते स्वाभाविकच होतं. प्रशासकीय कामात गुंतलेला अधिकारी अशा बाईक रॅलीसाठी स्वतः दुचाकी बुलेट चालवत रायडर म्हणून उत्साहाने सहभाग घेण्याकरिता आला होता, हे सर्वांसाठी नक्कीच वेगळं होतं. पण माझ्यासाठी हा क्षण खास वेगळा होता – एक छंद जोपासण्यासोबतच लोकशाहीसाठी योगदान देण्याची ही मला मिळालेली एक प्रकारची संधीच होती.
सकाळी ९.४० वाजता, महानगरपालिका आयुक्त अभिजीतने झेंडा दाखवून बाईक रॅलीची सुरुवात केली. १५ किमी लांब या रॅलीचा मार्ग नागपूरच्या महत्त्वाच्या चौकांमधून होता – व्हीसीए चौक, आकाशवाणी चौक, अहिंसा चौक, शंकर नगर चौक, व्हेरायटी चौक, सरदार पटेल चौक, वैद्यनाथ चौक, मेडिकल, क्रीडा चौक, जगनाडे चौक, सीए रोड, आणि छावणी सदर असा हा प्रवास राहणार होता. या प्रवासात नागपूर शहराचं वेगळं रूप मला प्रत्यक्ष पाहायला मिळालं. खरंतर नागपूर शहराला मी भरपूर वर्ष सेवा दिलेली आहे. दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्रामध्ये प्रतिनियुक्ती वर असताना माझा बराच काळ या शहरात मी आनंदाने व्यतीत केलेला आहे. या रस्त्याची आणि शहराची जुनी ओळख आहे, जुनी ओळख असल्याने होणारा बदल हा लगेच लक्षात येतो व झालेला बदल हा प्रत्यक्षात बघण्यात देखील वेगळीच मजा असते !
प्रत्येक चौकात नागपूरकर रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद देत होते. ते त्यांच्या मोबाईल मधील कॅमेऱ्यांनी वोटर्स जनजागृती बाबत बाईक रॅलीचे फोटो व व्हिडिओ टिपत होते. विशेष म्हणजे नऊवारी साड्यांमध्ये पारंपरिक महाराष्ट्रीयन वेशभूषा केलेल्या महिला बाईक चालवत जनजागृती करताना दिसल्यात त्या दृश्याने मन भारावून गेले. किती तो उत्साह !
या बाईक रॅली दरम्यान, मला वाहतुकीचा बारकाईने अभ्यास करता आला. चौकांमध्ये वाहतुकीचं नियमन करणाऱ्या पोलिसांच्या अडचणी, बाजारपेठांची गजबज, रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या सामान्य माणसांच्या समस्या, ती वर्दळ, धूर, कर्ण कर्कश आवाज यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. वाहन चालकांच्या अडचणी समजून घेण्याची ही संधी मला प्रशासनाच्या एका वेगळ्या बाजूला उजागर करणारी वाटली. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, मी आणि विनायक महामुनी जिल्हा परिषद सीईओ– नुकताच प्रशासनात दाखल झालेला एक तरुण अधिकारी –आम्ही एकत्र एकाच बाईकवर होतो. मी रायडरच्या भूमिकेत तर विनायक प्रोत्साहन देण्याच्या भूमिकेत होता. विनायकच्या उर्जेने आणि तारुण्याने मला माझे प्रशासनात प्रवेश केल्यानंतर सुरुवातीचे दिवस आठवले. या रॅलीने एक नवीन पिढीशी जोडण्याचा मला अनुभव दिला.
“नागपूरकर वोटकर ” या घोषवाक्याने जनजागृती करिता काढलेली बाईक रॅलीने ७५% पेक्षा जास्त मतदान करण्याचा संदेश देणं हे आमचं प्रमुख उद्दिष्ट होतं. रॅलीच्या मार्गावर, लोकांनी एकीकडे मतदानाची जनजागृती पाहिली तर दुसरीकडे राजकीय पक्षांचा कार्यकर्तेद्वारे होणारा प्रचार !! “प्रचार” आणि “जनजागृती” दोन शब्दांमधील महत्त्वाचा फरक या कृतीद्वारे स्पष्ट होत असतो. आचारसंहिताच्या काळात प्रशासकीय अधिकारी म्हणून बरेच बंधने असतात ! या बाईक रॅलीच्या मार्फतीने मतदाना करिता नागपूरकरांना प्रोत्साहन करणे व लोकशाही साठी योगदान देणे हेच आमचं काम लोकांपर्यंत पोहोचण्याचं होतं !
या बाईक रॅलीमुळे मला प्रशासकीय कामकाजाबाहेरचं जीवन जाणून घेता आलं. बाईक चालवत असताना काही वेळेस माझी “पोलीस आयुक्त” म्हणून ओळख लपून राहिली. लोकांच्या नजरेतून मी एक सामान्य रायडर होतो. हे क्षण माझ्यासाठी खास होते. ओळख आणि अधिकार सोडून, जेव्हा आपण जनतेत मिसळतो, तेव्हा खऱ्या समस्या समजतात, आणि आपल्या कामाचं प्रतिबिंब बघता येतं.
ही बाईक रॅली केवळ मतदान जनजागृतीसाठी नव्हती, तर नागपूरकरांशी संवाद साधण्यासाठी आणि लोकशाही प्रक्रियेत योगदान देण्यासाठी होती. या उपक्रमाने मला पुन्हा एकदा आठवण करून दिली की, नेतृत्व म्हणजे केवळ आदेश देणं नव्हे, तर स्वतः पुढाकार घेणं. लोकशाहीचा सन्मान ठेवत आणि नागपूरकरांशी संवाद साधत, ही रॅली माझ्यासाठी केवळ एक प्रवास नव्ह्ता –तर ती एक प्रेरणादायी विस्मरणीय बाब होती.
– डॉ.रवींद्र सिंगल
पोलीस आयुक्त
नागपूर शहर
Quitters Don’t Win and Winners Don’t Quit.
Ironman | Deccan Cliffhanger | Comrade Legend Finisher | Motivational Speaker | Writer | Endurance Athlete